पार्सल ची अनधिकृत वाहतूक केल्यास बस जप्त करणार आणि चालक वाहकावर बदलीची कारवाई होणार

1
4556

अनधिकृत पार्सलची वाहतूक केल्यास खाजगी बस जप्त करणार

एसटी कामगारांनी अनधिकृत पार्सलची वाहतूक केल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम त्याच्यावर बदलीची आणि दुसऱ्यांदा थेट बडतर्फीची सूचना…

मुंबई नगरी टीम #MyMsrtc

मुंबई : राज्यातील खासगी प्रवासी ट्रॅव्हल्स बसेसनी प्रवाशांची वाहतूक करताना सुरक्ष‍िततेबाबत संपूर्ण दक्षता घ्यावी. तसेच खासगी प्रवासी बसेसनी कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत कुरिअर वाहतूक, अनधिकृत पार्सल वाहतूक किंवा अनधिकृत लगेज वाहतूक करु नये. अशी वाहतूक करताना खासगी प्रवासी ट्रॅव्हल्स बसेस आढळल्यास त्यांच्यावर परवाना निलंबनाची तसेच जागेवर बस जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विविध प्रवासी वाहतूक संघटनांना दिला. एसटी बस वाहतुकीच्या सुरक्ष‍िततेचा विषयही महत्वाचा असून एखाद्या एसटी बसचालकाने अथवा वाहकाने अनधिकृत पार्सलची वाहतूक केल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम त्याच्यावर बदलीची आणि दुसऱ्यांदा थेट बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री रावते यांनी आज एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
रायगड जिल्ह्यात एसटी बसमध्ये नुकत्याच सापडलेल्या स्फोटकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी बससह खासगी ट्रॅव्हल्स, स्कूल बस, इतर प्रवासी वाहतूक साधने यांच्या सुरक्षीततेसंदर्भात आज मंत्रालयात मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते
रावते म्हणाले, रायगड जिल्ह्यात एसटी बसमध्ये नुकत्याच सापडलेल्या स्फोटकाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या तसेच खासगी ट्रॅव्हल्सच्या सुरक्ष‍ित बस वाहतुकीचा प्रश्न समोर आला आहे. एसटी महामंडळाने परिपत्रक काढून कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत पार्सलची वाहतूक करु नये, अशा सूचना चालक आणि वाहकांना दिल्या आहेत. पण त्याबरोबरच कोणी अशी वाहतूक करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी सूचना मंत्री रावते यांनी यावेळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली. एसटी बसने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर पोलीस चौकीची उभारणी करण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री रावते यांनी यावेळी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील म्हणाले, प्रवाशांची सुरक्षितता हा अत्यंत महत्वाचा विषय असून यासाठी गृह आणि परिवहन विभागाने समन्वयाने काम करावे. दुर्दैवाने प्रवासी वाहतुकीत स्फोटके सापडण्यासारखी किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावेळी चालक तथा वाहकाने नेमके काय करावे, कोणाशी संपर्क साधावा आदी बाबतही एक सूचनावजा परिपत्रक तथा एसओपी निर्गमित करण्यात यावा, असेही मंत्री डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here