एस.टी. महामंडळाची सुरक्षितता मोहीम

0
836

विनाअपघात सेवा देण्याचा मानस

इतर वाहनांच्या तुलनेत एसटी चे रस्ता अपघाताचे प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे लाखो प्रवासी सुरक्षित प्रवासासाठी महामंडळाला प्राधान्य देत आले आहेत. परिणामी अपघात विरहीत सेवा देण्यासाठी एसटी प्रयत्नशील असून यापुढील काळात यात आणखी सुधारणा करण्यासाठी एसटी “विना-अपघात सुरक्षितता’ मोहीम हाती घेतली आहे.

दि. 11 ते 25 जानेवारीदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या मार्गदर्शनानुसार सगळीकडे सुरक्षितता पंधरवडा साजरा केला जाणार आहे. यात एसटी महामंडळ सहभाग घेत असते. शुक्रवारी स्वारगेट येथील आगारात विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) मच्छिंद्र पंडीत, आगार व्यवस्थापक एस. एस. शिंदे, पी. एल. कांबळे, स्वारगेट आगाराचे बसस्थानक प्रमुख सुनील हिवाळे आदी उपस्थित होते.

महामंडळ भरती प्रक्रियेपासूनच चालकांच्या समुपदेशनामध्ये सुरक्षित प्रवासाबाबत जागरूक व संवेदनशील आहे. परिणामी महामंडळाच्या एसटी अपघातांचा दर लाख कि.मी.ला 0.15 टक्‍के इतका कमी प्रमाणात आहे. चालकांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, वैद्यकिय तपासणी, समुपदेशन आशा विविध मार्गाने अपघात विरहीत सेवा देण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील असून सुरक्षित सेवा देणाऱ्या चालकांना यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी रोख बक्षीसे, प्रमाणपत्रे, सुरक्षित सेवेचे बिल्ले देऊन सन्मानित करण्यात येते. दरम्यान, “एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास ’ हे ब्रीद घेऊन पुढील पंधरा दिवस विभागातील सर्व आगारांमध्ये “विना-अपघात सुरक्षितता’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here